Railway Ticket Discount : २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. रेल्वे तिकिटावरील सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे. कोरोना महासाथीपूर्वी रेल्वे तिकिटांवर ४०% ते ५०% सूट दिली जात होती, परंतु कोरोनाच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली आहे. आता महासाथीचा प्रभाव संपला असला तरी अद्याप ही सवलत सुरू करण्यात आलेली नाही.
२०१९ पर्यंत मिळत होती सवलत
२०१९ च्या अखेरपर्यंत भारतीय रेल्वे मेल, एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी व दुरंतो सारख्या गाड्यांच्या तिकिटांवर ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात येत होती. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुष प्रवाशांना तिकिटांवर ४०% व ५८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना ५०% सूट दिली जात होती. उदाहरणार्थ, राजधानी एक्स्प्रेसचे फर्स्ट एसीचं तिकीट ४,००० रुपये असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे तिकीट केवळ २,००० किंवा २,३०० रुपयांना मिळत होतं.
कोरोनानंतर सुविधा बंद
कोरोना महासाथीच्या काळात, २०२० मध्ये सरकारनं रेल्वे तिकिटांवरील ही सवलत बंद केली होती. महासाथ संपल्यानंतरही ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली नाही. निवृत्तीनंतर उत्पन्नाची साधनं मर्यादित असल्याचं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. अशा तऱ्हेनं त्यांचा प्रवास रेल्वेच्या सवलतीमुळे स्वस्त झाला होता. आता त्यांना दिलासा मिळावा म्हणून ही सवलत पूर्ववत करावी, अशी त्यांची मागणी आहे.
अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
१ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
केंद्र सरकारनं त्यांच्या मागणीचा अर्थसंकल्पात समावेश करावा, असं ज्येष्ठ नागरिकांचं मत आहे. यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार असून त्यांचा प्रवास परवडणारा होणार आहे.
आता अर्थमंत्री ज्येष्ठ नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण करतात का, हे बघावे लागेल. २०२५ चा अर्थसंकल्प त्यांच्यासाठी दिलासा देणारा ठरेल का?