मंडळी महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी अर्ज करता येतो. या योजनांमध्ये तुषार संच, ठिबक सिंचन, रोटावेटर, ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारी इतर साधन सामुग्रीचा समावेश आहे. शेतकरी पीव्हीसी (PVC Pipe) किंवा एचडीपीई (HDPE Pipe) पाइपसाठीही अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत कृषि विभागाकडून 50% अनुदान दिले जाते.
पीव्हीसी किंवा एचडीपीई पाइप शेतीतील पाणी इतर ठिकाणी वाहून नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून या अनुदानाचा लाभ घ्यावा.
पीव्हीसी पाइपसाठी 50% किंमतीपर्यंत अनुदान मिळते किंवा 35 रुपये प्रति मीटरच्या दराने जास्तीत जास्त 15,000 रुपये मिळू शकतात. एचडीपीई पाइपसाठी 50 रुपये प्रति मीटरच्या दराने जास्तीत जास्त 15,000 रुपये अनुदान उपलब्ध आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाइन सोडतीत निवड झाल्यानंतर पाइप खरेदी करताना त्या पाइपवर CML क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच, ज्या विक्रेत्याकडून पाइप खरेदी करणार आहात, त्याच्याकडे डीलरशिप प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
पीव्हीसी पाइपसाठी अर्ज कसा करावा?
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी प्रथम पोर्टलवर लॉगिन करा. नंतर अर्ज करा हा पर्याय निवडून सिंचन साधने व सुविधा हा विभाग निवडा. यामध्ये पीव्हीसी किंवा एचडीपीई पाइपचा पर्याय निवडावा. पाइप लांबी मीटरमध्ये टाकून अर्ज जतन करावा. मुख्य पृष्ठावर येऊन अर्ज सादर करा हा पर्याय निवडून अर्ज जमा करावा.
अर्ज सादर झाल्यानंतर, जिल्ह्याच्या लक्षांकानुसार अर्जाची सोडत होते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली जाते.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि शेतीसाठी जलसिंचनाची सुविधा अधिक प्रभावी बनवावी.