नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पोट खराब जमीन म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि त्याचा उपयोग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे बहुतांश नागरिक शेती करतात. त्यामुळे शेतीयोग्य आणि नापीक जमिनीचे वर्गीकरण महत्त्वाचे ठरते. यामध्ये पोट खराब जमीन आणि शेतीयोग्य जमीन असे दोन मुख्य प्रकार आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये जमीन महसूल कायद्यात सुधारणा केली. या सुधारण्यांमुळे काही पोट खराब जमिनी लागवडीखाली आणणे शक्य झाले.
पोट खराब जमिनीचे मुख्यता दोन प्रकार आहेत.
पहिला प्रकार म्हणजे पोट खराब जमीन – वर्ग अ. या गटात खडकाळ क्षेत्र, नाळे, वाळवंट आणि पडीक जमिनींचा समावेश होतो. ही जमीन अत्यंत नापीक असल्यामुळे कोणतेही पीक घेणे शक्य नसते. तसेच, या जमिनींवर नागराणी किंवा इतर कृषी उपक्रम करणे कठीण असते.
दुसरा प्रकार म्हणजे पोट खराब जमीन – वर्ग ब. या गटात सार्वजनिक वापरासाठी राखीव जमिनींचा समावेश होतो. शेतातून दुसऱ्या शेतात जाणारे रस्ते, नद्या-नाल्यांचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या जागा यासाठी ही जमीन वापरण्यात येते. अशा जमिनींवर महसूल आकारला जातो.
पोट खराब जमिनीचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुमची जमीन महामार्ग किंवा मोठ्या रस्त्यालगत असेल, तर त्यावर उद्योग, गोडाऊन, पेट्रोल पंप, हॉटेल, दुकान यांसारखे व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये योग्य नियोजन करून ही जमीन शेतीयोग्य बनवता येऊ शकते.
पोट खराब जमिनीचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते. त्यामुळे या जमिनीचा तंत्रशुद्ध आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य वापर करणे गरजेचे आहे.