मित्रांनो जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25% भरपाई अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
खरीप हंगामातील नुकसानभरपाई
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासारख्या पिकांना अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत 25% अग्रिम विमा रक्कम देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशानुसार 412.30 कोटी रुपयांची रक्कम दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
जालना जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी पर्जन्यमान 603.1 मिमी असताना यंदा 812.4 मिमी पाऊस झाला आहे, जो सरासरीच्या तुलनेत 134.9% जास्त आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदत
युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाईसाठी 25% अग्रिम रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
शासनाकडून निधी प्राप्त होताच ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
या निर्णयामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होऊन त्यांना नवीन पेरणीसाठी तयारी करता येईल.