नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच ईपीएफओ 3.0 ही अत्याधुनिक प्रणाली सुरु करणार आहे. येत्या मे अथवा जूनपासून ही प्रणाली कार्यान्वित होणार असून, त्यामुळे देशातील नऊ कोटी पीएफ खातेदारांना अधिक जलद आणि सुलभ सेवा मिळणार असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले.
नवीन प्रणालीत ईपीएफओ पूर्णपणे डिजिटल स्वरूपात काम करेल. सुधारित आयटी प्रणालीमुळे पीएफशी संबंधित सेवा अधिक वेगाने व सहज उपलब्ध होतील. दावा प्रक्रियेतील हस्तक्षेप कमी होईल, खात्यांतील माहिती ऑनलाइन दुरुस्त करता येईल, आणि विशेष म्हणजे – एटीएमच्या माध्यमातून पीएफ रक्कम काढण्याची सोय मिळणार आहे.
पेन्शन प्रणालीत सुधारणा
सध्या देशात केंद्रीय पेन्शन पेमेंट प्रणाली लागू आहे, ज्याअंतर्गत ७८ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही बँकेत पेन्शन मिळते. पूर्वी ही सुविधा केवळ विशिष्ट बँक खात्यापुरती मर्यादित होती. सरकार आता अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना आणि श्रमिक जन-धन योजनेचा समावेश करून सर्व सामाजिक सुरक्षा योजना एकत्र करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. त्यामुळे पेन्शनसंबंधित सुविधा अधिक व्यापक होतील.
पीएफ खात्यातील रक्कम आणि व्याज
सध्या देशभरात पीएफ खातेदारांची संख्या ९ कोटी आहे. त्यांच्या वेतनातून कपात झालेली रक्कम ईपीएफओकडे जमा होते. एकूण निधी २७ लाख कोटी रुपयांवर गेला असून, त्यावर वार्षिक ८.२५ टक्के व्याज दिले जाते.
मोफत उपचारांची व्याप्ती वाढणार
एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) लवकरच आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुविधा देणार आहे. यामध्ये खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांचा समावेश होईल, ज्यामुळे या योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढेल. आतापर्यंत १८ कोटींहून अधिक कामगारांनी ईएसआयसीमार्फत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. देशभरात १६५ रुग्णालये, १५०० डिस्पेन्सऱ्या आणि २००० मान्यताप्राप्त रुग्णालये या योजनेच्या अंतर्गत कार्यरत आहेत.