शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावांमध्ये शेत, शिवार आणि पाणंद रस्ते कालबद्ध पद्धतीने खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने सोमवारपासून (ता. २०) ३१ मार्च २०२५ पर्यंत एक कार्यसूची तयार केली आहे. या कार्यक्रमाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात सोमवारपासून शुक्रवारपर्यंत (ता. २४), संबंधित गावांचे तलाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब) आणि पायमार्गांचे नकाशे प्राप्त करणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारीदरम्यान, या नकाशांमध्ये दर्शवलेल्या बंद रस्त्यांची यादी तयार केली जाईल आणि बंद रस्त्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याची माहिती गोळा केली जाईल.
तिसऱ्या टप्प्यात १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत, बंद रस्त्यांवरील भोगवटाधारकांची यादी तयार केली जाईल.
चौथ्या टप्प्यात, ८ ते १५ फेब्रुवारीदरम्यान, संबंधित भोगवटाधारक, सरपंच आणि इतर ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्ते खुले करण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल. त्यात सर्व सहमतीने रस्ता खुला करण्याचा प्रयत्न होईल, तसेच वादग्रस्त रस्त्यांवर लोकअदालतीच्या निकषानुसार निर्णय घेतला जाईल.
पाचव्या टप्प्यात, १६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान, रस्ते खुला न झाल्यास उपअध्यक्षक भूमी अभिलेख यांच्या सहाय्याने पोलिसांच्या मदतीने रस्ता उघडण्यात येईल.
अखेर १ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान, पाचव्या टप्प्यातील रस्ते खुले न झाले तरी प्राधिकृत कायद्यांच्या निकषानुसार योग्य कार्यवाही केली जाईल.
या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअध्यक्षक भूमी अभिलेख आणि पोलिस निरीक्षक यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत.