शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत प्रश्न नेहमीच उपस्थित होतो, आणि अनेक वर्षांपासून सरकार तसेच शाळा हे ओझे कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आता दहावीच्या अभ्यासक्रमात होणाऱ्या बदलांमुळे हे ओझे आणखी वाढणार असल्याचे दिसते आहे. नवीन आराखड्यानुसार, विद्यार्थ्यांना 7 ऐवजी 15 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे, ज्यामुळे शाळांची वेळही वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना 7 ते 8 विषयांचा अभ्यास होता. पण आता नवीन आराखड्यात विविध विषयांची भर घालण्यात आली आहे. व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, अंतर्गत विद्या शाखा हे विषय बंधनकारक करण्यात आले आहेत.
त्यासोबत विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण, आणि तीन नवीन विषय असा विस्तारित अभ्यासक्रम होणार आहे. याशिवाय, स्काऊट गाईडसारख्या उपक्रमांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, भारतीय भाषांचा समावेश अनिवार्य केला गेला आहे. शाळांकडून सूचना आल्यावरच हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्यसाधनांची ओळख करून देण्यात येणार आहे, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना बागकाम, सुतारकाम आणि परिचय यांसारख्या व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. कला शिक्षणामध्ये दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, आणि लोककला हे विषय शिकवले जातील.
दहावीच्या अभ्यासक्रमात तीन भाषांचे अध्यापन बंधनकारक असेल, ज्यामध्ये दोन भारतीय भाषा शिकवणे अनिवार्य असेल. अकरावी आणि बारावीमध्येही अभ्यासक्रम बदलले जात असून, विद्यार्थ्यांना दोन दिवसांच्या अध्ययनाचे नियोजन करावे लागेल, त्यात एक भाषा भारतीय असावी. यामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी पाच ऐवजी दहा विषय शिकावे लागणार आहेत, आणि यासोबतच शाळेच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ह्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या ओझ्यात वाढ होण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी विविध कौशल्यांचे विकासाचे नवे मार्गही उघडले जात आहेत.