मंडळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईवर बंदी घातली आहे. ही कारवाई बँकेत काही गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर करण्यात आली आहे. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, १३ फेब्रुवारी २०२५ पासून या बँकेकडून कोणतेही नवीन कर्ज वाटप केले जाणार नाही. तसेच, जुन्या कर्जाचे नूतनीकरणही होणार नाही. या बंदीमुळे बँकेचे ग्राहक आपले पैसे काढू शकणार नाहीत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
या आदेशानंतर शुक्रवारी बँकेच्या शाखांबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ग्राहक आपले पैसे काढण्यासाठी हतबल झाले होते.
रिझर्व्ह बँकेच्या मागील कारवाई
रिझर्व्ह बँकेने यापूर्वीही अनेक बँकांवर अशाच प्रकारचे निर्बंध घातले आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घालण्यात आली होती. त्याआधी पीएमसी बँक आणि येस बँकेवरही अशीच कारवाई करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधील सहकारी बँकांवरही आरबीआयने बंदी घातली होती.
बँकांवर बंदी का घातली जाते?
बँकांनी ग्राहकांच्या ठेवींची फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा तक्रारी आल्यानंतर रिझर्व्ह बँक त्या बँकांची चौकशी करते. चौकशीदरम्यान काही अनियमितता आढळल्यास, आरबीआय त्या बँकेवर बंदी घालते. या काळात बँक ग्राहकांचे पैसे काढण्यावर मर्यादा आणते किंवा ते पूर्णपणे थांबवते. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहते.
जर बँक अपयशी ठरली किंवा आरबीआयने तिचा परवाना रद्द केला, तर ग्राहकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपये परत मिळतात. ग्राहकांचे कोट्यवधी रुपये बँकेत जमा असले तरीही हीच रक्कम मिळते. रिझर्व्ह बँकेने गेल्या काही वर्षांपूर्वी स्पष्ट केले आहे की, ग्राहकाच्या ठेवीचा विमा जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंतच असतो. बँक बुडाल्यास ग्राहकाला हीच रक्कम मिळते. हा विमा डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) या संस्थेद्वारे काढला जातो.
जमा रकमेचे नियम काय आहेत?
समजा, तुमच्याकडे एका बँकेत २ लाख रुपये बचत खात्यात, २ लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) आणि त्याच बँकेत दुसऱ्या खात्यात ३ लाख रुपये आहेत. या सर्व खात्यांची एकूण रक्कम ७ लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, जर ती बँक बुडली तर तुम्हाला जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. एकाच बँकेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये रक्कम जमा असली तरीही हाच नियम लागू होतो.
पैसे कसे सुरक्षित ठेवायचे?
तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण रक्कम एकाच बँकेत ठेवू नका. तुमची बचत वेगवेगळ्या बँकांमध्ये विभाजित करा. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे ८ लाख रुपये आहेत, तर ते दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये ४-४ लाख रुपये अशा प्रकारे ठेवा. जर दोन्ही बँका बुडाल्या तर तुम्हाला प्रत्येक बँकेकडून ५ लाख रुपये अशी एकूण ८ लाख रुपये मिळतील. कारण विम्याच्या नियमांनुसार प्रत्येक बँकेकडून जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळण्याची हमी असते.