मंडळी हवामान खात्याने दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी देशातील आगामी मान्सून हंगामाचा (जून ते सप्टेंबर) दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी एकत्रितपणे हा अंदाज सादर केला.
यावर्षीचा मान्सून देशासाठी अनुकूल राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, सरासरीपेक्षा 105% पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक सकारात्मक बातमी मानली जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीस चिंतेचे वातावरण असले, तरी आता अधिक पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या संदर्भात बोलायचे झाले तर, यावर्षी महाराष्ट्रातही समाधानकारक आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. विशेषता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्हे, खानदेशाचे काही भाग आणि कोकणातील किनारी पट्टा याठिकाणीही चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठीय तापमान आणि हिंद महासागरातील आयओडी (Indian Ocean Dipole) दोन्ही तटस्थ राहण्याची शक्यता आहे. तसेच, युरेशियामधील बर्फाचे आवरण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळेही मान्सूनसाठी वातावरण पोषक राहणार आहे.
या सर्व अनुकूल हवामान घटकांमुळे 2025 चा मान्सून हंगाम समाधानकारक आणि पावसाळ्याच्या दृष्टीने समृद्ध ठरेल, अशी अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे.