मंडळी राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. जानेवारीपर्यंत सात हप्त्यांचे वितरण झाले असले तरी, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही रक्कम न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब होण्यामागे तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे असल्याचे सांगितले जात आहे. काही महिलांचे अर्ज तपासणी प्रक्रियेत असल्याने त्यांना हप्ता थोड्या उशिराने मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता वितरित केला जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या हप्त्याचे वितरण लवकर होईल, असे आश्वासन दिले होते. योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून तो लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नसल्याने हजारो महिलांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
फेब्रुवारी महिन्यात आठवा हप्ता वितरित केला जाणार होता. पण तांत्रिक अडचणी आणि पडताळणी प्रक्रियेमुळे तो मार्च महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. पण हप्ता वेळेवर न मिळाल्यास अनेक महिलांचे आर्थिक नियोजन बिघडत आहे. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.