मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल ११ लाख ९ हजार ४७८ महिलांनी अर्ज केले होते. प्रारंभी त्यांना तीन हप्त्यांचा लाभही मिळाला मात्र अलीकडेच झालेल्या बारकाईने पडताळणीनंतर काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील १२,००० महिलांकडे स्वत:च्या नावावर चारचाकी वाहने असल्याचे आढळले आहे. तसेच २८,००० महिला आधीपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता.
राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना जाहीर केली होती. राज्यभरातून अडीच कोटी महिला आणि सोलापूर जिल्ह्यातून ११ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले. काहींनी अपात्र असूनही लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केला. त्यामध्ये इतर राज्यांतील महिलांचाही समावेश होता.
तक्रारी वाढल्यावर राज्यस्तरावर सखोल पडताळणी केली गेली. त्यामध्ये राज्यातील १५ लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या. तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या १९ लाख महिलांनाही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ दिला जात होता.
या महिलांना आधीच दरवर्षी १२,००० रुपये मिळत असल्याने, त्यांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा फक्त ५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी सुरू असून, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचा लाभ देखील थांबवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, योजनेचा पुढील हप्ता २५ एप्रिलपूर्वी वितरित होणार आहे.
सोलापूरमधील लाभार्थ्यांची स्थिती
सोलापूर जिल्ह्यात ५ लाख १८ हजार शेतकरी प्रधानमंत्री व नमो सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये १ लाख ४० हजार महिला आहेत. या महिलांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेतून दरमहा ५०० रुपयेच मिळणार आहेत.
संजय गांधी योजना, स्वतःच्या नावावर चारचाकी असलेल्या महिला आणि इतर अपात्र घटकांचा लाभ बंद करण्यात आला आहे. मात्र नेमके किती लाभार्थी वगळले गेले, आणि त्यांना लाभ कधी मिळणार, याबाबत स्थानिक स्तरावर अजूनही स्पष्टता नाही.