नमस्कार राज्यातील काही कुटुंबांचा वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती, आणि जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
या योजनेत, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, आणि आता सर्वांचे लक्ष डिसेंबर महिन्याच्या हप्त्यावर आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजना एक मोठा प्रचारात्मक मुद्दा ठरला होता. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीकडून महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले, तर महायुतीने महिलांना 2,100 रुपये देण्याचं वचन दिलं.
आता राज्यात महायुतीचं सरकार आलं असून, 2,100 रुपये कधीपासून मिळू लागतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तथापि, पुढील काही महिन्यांपर्यंत महिलांच्या खात्यात 1,500 रुपयेच जमा होण्याची शक्यता आहे, आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2,100 रुपये मिळू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की ही योजना कधीही थांबणार नसून, चालूच राहील. डिसेंबरचा हप्ता याच महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होईल, असं ते म्हणाले. याचाच अर्थ लवकरच लाभार्थी महिलांना त्यांचे हप्ते मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनानंतर ह्या रकमांची अंमलबजावणी होईल, असं सूचित केलं आहे.