मित्रांनो राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ज्या लाभार्थी महिलांच्या खात्यात आधीच निधी जमा झाला आहे, तो परत घेण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही योजना सुरूच राहणार असल्याचे सांगितले. ज्या लाभार्थी बहिणींचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांची पडताळणी केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शासन स्तरावर लाभार्थ्यांची तपासणी (स्क्रुटिनी) सुरू झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील अर्ज छाननी आणि बाद झालेले अर्ज
लातूर जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 25,136 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अर्जांची सखोल छाननी केली जात आहे, त्यामुळे निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जात आहे.
लातूर जिल्ह्यात योजनेच्या पहिल्या टप्प्यात 3,42,152 अर्ज, तर दुसऱ्या टप्प्यात 2,50,067 अर्ज आले होते. एकूण 5,92,219 अर्जांवर छाननी सुरू असताना मोठ्या प्रमाणात अर्ज बाद करण्यात आले.
अर्ज रद्द होण्याची कारणे
1) अर्जदारांचे उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचे आढळले.
2) काही अर्जांसोबत अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे होती.
3) काही प्रकरणांमध्ये खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे आढळले.
4)काही अर्जदारांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली.
योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रम
लाडक्या बहिणींना दर महिन्याला ₹1,500 मिळण्याची अपेक्षा असते. आतापर्यंत 7 महिन्यांचे हप्ते* जमा झाले आहेत. अर्जांची छाननी आणि निकष तपासणीमुळे आता 8 वा हप्ता मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली असली तरी आता लाभार्थ्यांसाठी अटी आणि नियम काटेकोरपणे तपासले जात आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांना आपला लाभ कायम राहील की नाही, याची चिंता वाटत आहे.