मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरली होती. या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली. मात्र, सध्या सरकारने या योजनेत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून अनुदानाची रक्कम परत वसूल करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. विशेषता राज्यातील 20 लाख शेतकरी महिलांना या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
20 लाख शेतकरी महिलांना फटका
राज्यातील सुमारे 20 लाख शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेतील नव्या निकषांमुळे लाभ मिळणे कठीण होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणतेही कठोर निकष लागू न करता महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात थेट पाच हप्ते जमा करण्यात आले. आचारसंहितेच्या काळात ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती.
नमो शेतकरी योजनेलाही फटका
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता नवीन निकष लावले जात असून, अर्जांची पुनर्पडताळणी केली जात आहे. परिणामी, पूर्वी पात्र ठरलेल्या अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता मंजूर करण्यात आला असला तरी आता शेतकरी महिलांना वार्षिक ₹18,000 ऐवजी फक्त ₹12,000 मिळणार आहेत.
याचा थेट परिणाम नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या (Namo Shetkari Mahasanman Yojana) लाभार्थ्यांवर होणार आहे. या योजनेंतर्गत पूर्वी 19 लाख महिलांना लाभ मिळत होता, पण आता लाडकी बहीण योजनेतील ₹6,000 चा लाभ बंद करण्यात येणार आहे.
महिलांमध्ये नाराजीचे वातावरण
विरोधकांनी आधीपासूनच या योजनेवर टीका केली होती. ही योजना केवळ निवडणुकीपुरती असून, सरकार आता निकषांच्या आधारे महिलांना फसवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. नव्या निर्णयामुळे राज्यभरातील महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर आपल्या असंतोषाची भावना व्यक्त केली आहे.
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
लाडकी बहीण योजनेतील अचानक झालेल्या बदलांमुळे सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेली योजना आता काटछाटीच्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामुळे आगामी काळात सरकारला मोठ्या जनआक्रोशाचा सामना करावा लागू शकतो.