मंडळी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती आणि जुलै महिन्यापासून तिची अंमलबजावणी सुरू झाली.
आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यामुळे आचारसंहिता लागू असल्यामुळे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये एकाच वेळी जमा झाले होते. आता डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे.
महायुतीचे नेते याआधीच घोषणा करीत होते की, जर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2,100 रुपये जमा करण्यात येतील. आता महायुतीचे सरकार पुन्हा आले असून, याबाबतचे सर्वांचे लक्ष 2,100 रुपये कधी जमा होणार याकडे लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, योजनेला सतत चालू ठेवण्यासाठी आवश्यक तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात येतील.
यादरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत, ज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते आणि पूल बांधणीसाठी 1,500 कोटी, मोदी आवास योजनेसाठी 1,250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटी आणि अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद आणि अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी सरकारचे डबल गिफ्ट मानली जात आहे.