मंडळी राज्य सरकारद्वारे सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत नोव्हेंबर २०२४ पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात ७५०० रुपये (प्रत्येक महिन्यासाठी १५०० रुपये) थेट जमा करण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे पुढील हप्ता मिळेल की नाही, असा प्रश्न महिलांना पडत आहे. या संदर्भात पारोळा येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले की २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होताच डिसेंबर महिन्याचे पैसे त्वरित पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातील. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवरही तीव्र शब्दांत टीका केली.
सभेला उपस्थित लाडकी बहिणींची मोठी संख्या पाहून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या बकासुरा च्या विरोधात आपण एकत्र आलो आहोत. चिमणराव पाटील हे जनतेच्या हितासाठी काम करणारे खरे नेता आहेत. त्यांनी शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून देताना म्हटले की, बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे दिले. मी धाडस दाखवले नसते तर शिवसेना आणि तिचे प्रतीक धनुष्यबाण आज विकले गेले असते.
शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना म्हटले की, ते सरकार विकासविरोधी होते आणि काम बंद पाडणारे होते. तसेच त्यांनी आपल्या सरकारच्या निर्णयांवर प्रकाश टाकताना सांगितले की, आम्ही घरगुती वीज बिलावर ३०% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिजन महाराष्ट्र 29 योजना सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीही अनेक निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी विरोधकांच्या घोषणांचा संदर्भ देत विनोदपूर्वक म्हटले, गुलाबरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर, टांगा पलटी घोडे फरार. पण आम्ही जे केलं ते योग्य केलं.