महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे पाऊल म्हणून ओळखली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजने अंतर्गत आतापर्यंत हजारो महिला लाभार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणलेला आहे. आता या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत, त्याची सविस्तर माहिती जाणून घेणे प्रत्येक लाभार्थीसाठी अत्यंत गरजेचे आहे.
गेल्या काही महिन्यामध्ये या योजनेने खूप जास्त प्रगती केली आहे. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत, पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 7,500 रुपये पाच हप्त्यांमध्ये जमा केले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यापासून ते छोट्या व्यवसायांची सुरुवात करण्यापर्यंत विविध प्रकारे आर्थिक मदत झाली आहे. या योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची भावना वाढीस लागली आहे, त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा होताना दिसत आहे.
परंतु, आता राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. मुख्य म्हणजे सहाव्या हप्त्याच्या निधी वितरणाबाबत काही कडक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामागचे मुख्य कारण म्हणजे या योजनेची पारदर्शकता अधिक वाढवणे व योग्य अशा गरजू लाभार्थ्यां पर्यंत ही मदत पोहोचवणे हे आहे.
सरकारने आता पात्रता निकषांची कठोर तपासणी सुरू केलेली आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत
1) काही ठिकाणी अपात्र व्यक्तींनी देखील ऑनलाईन अर्ज केल्याचे आढळून आले आहे.
2) काही लाभार्थी यांनी अर्जांमध्ये चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आले आहे.
3) आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे ही देखील मुख्य समस्या ठरलेली आहे.
4) तालुकास्तरीय समित्यांकडून काही अपात्र अर्जांना चुकीने मंजुरी दिली गेल्याचेही समोर आले आहे.
राज्य सरकारचे सहाव्या हप्त्याबाबत महत्त्वाचे निर्णय
या सर्व कारणांमुळे सहाव्या हप्त्याच्या वितरण करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी पात्रता निकषांचे उल्लंघन केलेले आहे किंवा चुकीची माहिती सादर केलेली आहे, त्यांना सहावा हप्ता दिला जाणार नाही. मात्र, ज्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज योग्य आहेत परंतु आचारसंहिता या कारणांमुळे त्यांना हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना आचारसंहिता संपुष्टात आल्यावर त्यांचे थकीत हप्ते जमा केले जातील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदान ठरलेली आहे. नव्याने घेतलेले निर्णय हे या योजनेची गुणवत्ता वाढवण्यासाठी व या योजनेला योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.