मंडळी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केली असून, त्यामुळे सध्याचा रेपो दर 6 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच इतर कर्जांवरील व्याजदर कमी होणार असून, याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज (9 एप्रिल 2025) सकाळी 10 वाजता हा निर्णय जाहीर केला. त्यांच्या कार्यकाळातील हा सलग दुसरा दिलासा देणारा निर्णय असून, यामुळे मंदीचा सामना करत असलेल्या रिअल इस्टेट आणि वाहन क्षेत्राला नवीन बळ मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या 5 वर्षांत (56 महिन्यांत) प्रथमच एवढ्या प्रमाणात रेपो दरात कपात करण्यात आली आहे. ही कपात ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारी ठरणार आहे. मागील काही काळापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठ, विशेषता टेक आणि रिअल इस्टेट कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होत होता. अशा स्थितीत आरबीआयचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरणार आहे.
दरम्यान, याआधी डिसेंबर 2024 मध्ये जैसलमेर येथे झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय 4 विरुद्ध 2 मतांनी घेण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 पासून RBI ने रेपो दर स्थिर ठेवले होते. मात्र संजय मल्होत्रा यांनी गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच रेपो दरात बदल सुरू झाले असून, यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.