मंडळी राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उच्चांक गाठला असून, विशेषता विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेची तीव्रता जाणवण्यासारखी आहे. या कडक उन्हात शाळांमध्ये परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता वाढली
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाला परीक्षा वेळापत्रकात तातडीने बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. या हस्तक्षेपामुळे शालेय प्रशासनासह पालकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
परीक्षा १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश
पूर्वी लागू करण्यात आलेल्या एकसंध राज्यव्यापी वेळापत्रकामुळे विदर्भातील परीक्षा कालावधी अधिक लांबला होता. त्यामुळे शिक्षक संघटना आणि स्थानिक शाळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता परीक्षा १५ एप्रिलपूर्वी घेण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार प्रशासन हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सुधारित वेळापत्रक कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवीन मूल्यांकन प्रणाली आणि आरोग्याचे भान
यंदा सुमारे १ कोटी ४५ लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे, नववीसाठी प्रथमच लागू करण्यात आलेली नियतकालिक मूल्यांकन पद्धती शिक्षण व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल ठरत आहे. विदर्भातील उष्णतेच्या तीव्रतेचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, त्यांना सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी वेळापत्रकातील बदल उपयुक्त ठरणार आहेत.