मित्रांनो राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने आपल्या खाद्यतेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात खाद्यतेल उपलब्ध करून देण्यासाठी आयात शुल्क रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आयात होणाऱ्या खाद्यतेलावर लावला जाणारा १५% वॅट कर कमी करून ५% केला आहे.
बांगलादेशमध्ये कापड उद्योग मोठा असला तरी देशांतर्गत कापसाची लागवड फारच कमी आहे, त्यामुळे कापसाची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते. यावेळी भारताऐवजी पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये वाढ करण्याच्या बांगलादेशच्या विचारामुळे कापसाच्या आयातीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशमध्ये खाद्यतेलाची वार्षिक मागणी २३ लाख टन आहे, आणि २०२३-२४ मध्ये देशात १३.५५ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड करण्यात आली. यामध्ये मोहरीची लागवड सर्वाधिक ६६% होती. परंतु या उत्पादनातून देशाच्या खाद्यतेलाची गरज पूर्ण होणे शक्य होत नाही, त्यामुळे बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करावे लागते.
आयात शुल्क आणि वॅटमुळे खाद्यतेलाचे दर वाढले होते, ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये असंतोष होता. याचा परिणाम म्हणून बांगलादेश सरकारने आयात शुल्क रद्द करून वॅट ५% करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खाद्यतेलाच्या दरात कमी होईल, आणि ते सामान्य जनतेच्या आवाक्यात राहतील अशी अपेक्षा आहे.
बांगलादेशमध्ये डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत सूर्यफूल, पाम, करडई आणि सोयाबीन तेलावर आयात शुल्क रद्द राहील. डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात २०% वाढ झाल्याने बांगलादेशमध्ये खाद्यतेलाचे दर ८% वाढले होते, परंतु आता या निर्णयामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशच्या या निर्णयाचा भारताच्या खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतात सध्या आयात शुल्क लागू असल्यामुळे, बांगलादेशमार्गे रिफाइंड तेलाची आयात वाढू शकते.