बंगालच्या उपसागरात दाना नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून, उद्या मध्यरात्रीपासून ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव पडणार नसला तरी, आज आणि उद्या राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचे दाना चक्रीवादळात रूपांतर झाले आहे, ज्याचे गतीमान होऊन ताशी 15 किमी वेगाने ते ईशान्य दिशेने सरकत आहे. चक्रीवादळाचा केंद्रबिंदू सध्या ओडिशाच्या पारादीपपासून 520 किमी दक्षिण-दक्षिणपूर्वेस, पश्चिम बंगालच्या 600 किमी आग्नेय-पूर्वेस, तसेच बांगलादेशातील खेपुपुराच्या 610 किमी दक्षिण-दक्षिणपूर्वेस आहे.
चक्रीवादळाच्या पुढील हालचालीमुळे उद्या सकाळपर्यंत ते तीव्र चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ओडिशातील भितरकनिका आणि धमारा दरम्यान उत्तर ओडिशा व पश्चिम बंगाल किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे, त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमी असू शकतो.
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. पालघर आणि मुंबई वगळता कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये, तसेच नंदुरबार आणि धुळे वगळता मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशीम येथेही पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे, तर रायगड, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, धाराशिव, बीड, नांदेड आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.