मित्रांनो HMPV (Human Metapneumovirus) या नवीन पसरणाऱ्या विषाणूने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. मुंबईतील पवईमधील हिरानंदानी रुग्णालयात 6 महिन्यांच्या बाळाला HMPV विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या बाळाची ऑक्सिजन पातळी ८४ टक्क्यांपर्यंत घसरली होती, त्यामुळे त्याला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्याला या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
हिरानंदानी रुग्णालयाने १ जानेवारीला या प्रकरणाची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली होती, परंतु बीएमसीच्या परळ येथील आरोग्य विभागाला अद्याप याबाबत काहीही अहवाल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या HMPV विषाणूवर कोणतेही विशिष्ट औषध उपचार उपलब्ध नाहीत, त्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या मदतीने उपचार केले जात आहेत.
चीनमध्ये HMPV मुळे हाहाकार माजल्याने भारतात देखील खबरदारी घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नेटवर्क लॅबोरेटरीजने नियमित तपासणीत काही प्रकरणे शोधली आहेत. तसेच, आरोग्य मंत्रालयाने चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी एक संयुक्त पाहणी पथक स्थापन केले आहे. हे पथक WHO कडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार पुढील उपाययोजना आखत आहे.