मंडळी राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आता वाढीव दराने नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. विशेषता जिरायती म्हणजेच कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३,६०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम फक्त ८,५०० रुपये होती.
भरपाईची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढली
या निर्णयानुसार, आता शेतकऱ्यांना ही मदत २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरपर्यंत मिळू शकते. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान जर ३ हेक्टरपर्यंत असेल, तर त्याला कमाल ४०,८०० रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते. दोन हेक्टर नुकसान झाल्यास २७,२०० रुपये, तर एक एकर (सुमारे ०.४ हेक्टर) नुकसान झाल्यास अंदाजे साडे पाच हजार रुपये मिळू शकतात.
नुकसानीचा कालावधी आणि पंचनामे
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये हवामानातील बदलांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. मात्र, नुकसान भरपाईबाबत स्पष्टता नव्हती. सरकारने नुकतेच ट्वीट करून कोरडवाहू पिकांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
फळपिकांच्या भरपाईबाबत अजूनही अनिश्चितता
सद्यस्थितीत फळपिकांना किती भरपाई दिली जाणार, याबाबत सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. शासन निर्णय (जीआर) जाहीर झाल्यानंतरच बागायती आणि फळपिकांच्या भरपाईबाबत स्पष्टता मिळणार आहे.
मागील निर्णयांचा आधार
यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्य सरकारने एनडीआरएफच्या ठराविक दरांपेक्षा अधिक रक्कम देऊन मदत केली होती. त्यावेळी कोरडवाहू पिकांसाठी १३,६०० रुपये, बागायती पिकांसाठी २७,००० रुपये आणि फळपिकांसाठी ३६,००० रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. त्याच धर्तीवर यंदाही कोरडवाहू पिकांसाठी वाढीव भरपाई दिली जाणार आहे.