नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, उत्पादनवृद्धी, आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती क्षेत्रातील प्रगती साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चला तर मग, शेतकऱ्यांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा पाहूयात.
1) शेतकऱ्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी किसान क्रेडिट कार्डाच्या कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. याआधी 3 लाखांपर्यंत असलेली कर्ज मर्यादा आता 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भांडवल मिळणार आहे.
2) भारताच्या यूरीया उत्पादनातील आत्मनिर्भरतेसाठी ईशान्य भारतात तीन नवीन कारखाने उभारले जाणार आहेत. हे कारखाने एकूण 12.7 लाख मेट्रिक टन यूरीया उत्पादन क्षमता असलेले असतील.
3) शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळावे आणि शेतीचे आधुनिकीकरण व्हावे यासाठी पंतप्रधान धन धान्य कृषी योजना जाहीर करण्यात आली आहे. 100 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, ज्याचा उद्देश 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत करणे आहे.
4) भारताच्या डाळ उत्पादनात वाढ करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना राबवली जाईल.
5) फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत भांडवल आणि विपणनाची सुविधा पुरवली जाईल.
6) बिहार राज्यातील मकाना उत्पादकांसाठी विशेष मकाना बोर्ड स्थापन केला जाईल, ज्यामुळे त्यांना थेट सरकारी मदत मिळेल.
7) अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवरील मासेमारीच्या क्षेत्रात विकास साधण्यासाठी खास योजना जाहीर करण्यात आली आहे.
8).देशातील कापूस उत्पादन वाढवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारित जाती विकसित केल्या जातील, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवली जाईल.
9).शेती क्षेत्र अधिक स्वयंपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.
10) शेतीशी संबंधित छोटे आणि मध्यम उद्योग (MSME) साठी 20 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत, तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवृद्धी आणि शाश्वत शेतीसाठी अधिक संधी मिळणार आहेत.