मंडळी नेपाळमध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा 15,900 रुपयांनी घटलेला आहे. हा निर्णय नेपाळ सरकारने भारताच्या धोरणांचा विचार करून घेतलेला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात भारताने आपल्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15% वरून 6% पर्यंत कमी केले होते, ज्यामुळे भारतात सोन्याचा भाव प्रति तोळा 6,000 रुपयांनी कमी झाला होता. नेपाळनेही असेच पाऊल उचलल्याने आता त्यांच्या देशात सोन्याचा दर मोठ्या प्रमाणावर घसरलेला आहे.
सीमाशुल्कात 50% कपात
नेपाळ सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 20% वरून 10% केले आहे, ज्यामुळे सोन्याचा दर प्रति तोळा 16,000 रुपयांनी कमी झाला आहे. फेडरेशन ऑफ नेपाळ गोल्ड अँड सिल्वर डीलर्स असोसिएशननुसार, हॉलमार्क सोन्याचा दर सोमवारी प्रति तोळा 1,51,300 रुपये होता, जो रविवारी 1,67,200 रुपये होता.
आर्थिक धोरणातील बदल
नेपाळ सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे. यापूर्वी नेपाळने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 20% पर्यंत वाढवले होते, पण सध्याच्या निर्णयामुळे ही वाढ मागे घेतली गेली आहे.
नेपाळच्या या निर्णयाचा उद्देश स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ घडवणे आणि ग्राहकांना दिलासा देणे असा आहे. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे सीमाभागातील व्यापारावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.