मंडळी सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याने आपल्या सर्व विक्रमांना मागे टाकत सर्वकालीन उच्चांक गाठला. त्याचवेळी, चांदीनेही आपली चमक दाखवत, प्रति किलो ९८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भारतात सोन्या-चांदीच्या किंमती गगनाला भिडत असून आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि सणासुदीत वाढलेली मागणी यामुळे या दरांवर परिणाम होत आहे. दिवाळीपूर्वी सोन्याचे दर प्रचंड वेगाने वाढत आहेत, तर चांदीची किंमत देखील विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याचे दर ४५० रुपयांनी वाढून ७८,१७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. चांदीतही लक्षणीय वाढ झाली असून ती २,८०० रुपयांनी वाढून विक्रमी उच्चांक गाठत आहे. शेअर बाजारही तेजीत आहे, ज्यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी चांगली कामगिरी केली आहे.
सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरांत वाढ होतच राहणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढले असून ते २,७४७ डॉलर प्रति औंस झाले आहेत, तर चांदीची किंमत ३४.२४७ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर ७३,००० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोन्याचे दर ७९,६४० रुपये प्रति १० ग्रॅम आहेत.