जिल्ह्यात विविध योजनांतर्गत घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी अनुदानाचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. रक्कमेचा व बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचा विचार केल्यास हे घरकूल बांधणे अवघड झाले आहे. सिमेंट, लोखंड, रेतीचे दर गगनाला भिडल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत.
पावसाळा संपून महिना उलटला आहे. तरीही परतीचा पाऊस काही पाठ सोडायचे नाव घेत नाही. परिणामी, अजूनही रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे उपसा व वाहतूक सध्या बंदच आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी उपसा करून ठेवलेला रेती साठाही आता कमी झाल्याने रेतीचे भाव वाढले आहेत.
तसेच विटांचे भावही दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मातीच्या विटांची किंमतही १२ हजार रुपये पार करून गेली आहे. सिमेंट, लोखंड व इतर साहित्यांच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. शिवाय बांधकाम कारागिरांची मजुरी वेगळीच असल्याने घरकूल लाभधारक त्रस्त झाले आहेत.
वीट, रेती, सिमेंट, गिट्टी, लोखंडाशिवाय घरकुलांचे बांधकाम करता येत नाही. एका घरकुलाला किमान १० ब्रास रेती आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून बांधकामासाठी मिळणाऱ्या रकमेत काम पूर्णचहोत नाही, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. तेव्हा विशेषतः घरकूल लाभार्थ्यांना रेती, गिट्टी व विटांचे वाढते दर पाहता हे शासनाने घर बांधकामाच्या साहित्यांचे दर कमी बांधकामाच्या साहित्यांचे दर कमी करून द्यावेत, अशी मागणी घरकूल लाभार्थ्यांमधून करण्यात येत आहे.
मागच्या काही महिन्यांपासून रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. रेती माफियांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकदा सामाजिक संघटना व घरकूल लाभार्थ्यांनी केली आहे; परंतु या मागणीकडे अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे रेती माफिया हे चढ्या दराने रेतीची विक्री करीत आहेत. एखाद्या दुसऱ्या रेती माफियांवर कारवाई करून रेती वाहतूक बंद होत नाही, असे लाभार्थी बोलत आहेत.