नमस्कार मित्रांनो राज्यभरातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर पुनर्भरणाची सुविधा देण्यात येणार आहे. ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येत आहे. 30 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेची कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे.
सध्या काही प्रकरणांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे नाव कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण येत आहे. या अडचणींवर उपाय म्हणून घरगुती गॅस सिलेंडरची नोंदणी घरातील महिलांच्या नावावर करण्यात यावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेतील अनुदान थेट महिलांना मिळेल. त्यामुळे मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला व बालविकास विभागाद्वारे पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थींपैकी ज्या महिलांच्या शिधापत्रिकेनुसार 1 जुलै 2024 पर्यंत कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर गॅस जोडणी होती, त्या महिलांनी स्वताच्या नावावर गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील.
मूळ शासन निर्णय दि. 30 ऑगस्ट 2024 आणि शासन शुद्धीपत्रक दि. 04 सप्टेंबर 2024 मधील इतर अटी व शर्ती कायम राहतील. हा शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दि. 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीनुसार जारी करण्यात आलेला आहे.