मंडळी राज्यातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार असल्याची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक हुशार मुलींना हवे तसे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत कोणत्या मुलींना लाभ मिळणार आहे, कोणते दस्तऐवज लागतील आणि यासाठी कोणत्या अटी लागू आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
राज्यातील शासकीय, शासन अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि सार्वजनिक विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना 100 टक्के शुल्कमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ही योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू होईल आणि तिचा लाभ 800 हून अधिक अभ्यासक्रमांसाठी मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. तसेच शासनाच्या CET किंवा तत्सम केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना ही सवलत मिळेल.
या सवलतीचा लाभ अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, कृषी, पशुसंवर्धन, फार्मसी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या प्रवेशांसाठी लागू असेल.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. जून 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला असून, विद्यार्थिनींना कोणतेही शुल्क भरावे लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागू नये यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी संबंधित महाविद्यालये किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत संकेतस्थळावर माहिती घ्यावी.