नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीने 2024 च्या विधानसभा निवडणुकांसाठी आपला जाहिरनामा सादर केला असून, त्यात शेतकऱ्यांसह महिलांना, बेरोजगारांना आणि समाजातील विविध घटकांना दिलासा देणाऱ्या महत्वाच्या घोषणा समाविष्ट आहेत. या जाहीरनाम्याचे सादरीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे नेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या जाहीरनाम्यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. नियमितपणे कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची योजना आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकेल.
महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणण्यात आली असून त्याअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 3000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल तसेच महिला आणि मुलींना सार्वजनिक बससेवेचा मोफत लाभ दिला जाईल. हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करेल.
याशिवाय जातिनिहाय जनगणना करण्याची महत्वाची घोषणा करण्यात आली असून, आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे समाजातील विविध गटांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळू शकेल.
आरोग्यसेवांमध्येही सुधारणा घडवून आणण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा तसेच मोफत औषध पुरवठा यांचा समावेश आहे, ज्यामुळे गरजू लोकांना चांगल्या आरोग्यसेवांचा लाभ घेता येईल.
बेरोजगार तरुणांसाठी देखील या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बेरोजगारांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळेल आणि भविष्यातील करिअरच्या संधी शोधण्यासाठी प्रेरणा मिळेल.
महाविकास आघाडीच्या या घोषणा समाजातील विविध घटकांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांची जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दिसतात.