महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. २०२३ च्या खरीप हंगाम मध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर, आता पीकविमा अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या महत्वाच्या आर्थिक मदतीमुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षाच्या खरीप हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या परिस्थितीचा विचार करून शासनाने पीकविमा अग्रिम देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २४१ कोटी रुपयांचा अग्रिम पीकविमा वितरित करण्यात आला होता. त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे त्यांना या पीक विमा अग्रीम भरपाईच्या पहिल्या टप्प्यात लाभ मिळू शकला नव्हता.
आता फेब्रुवारी महिन्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, पीकविमा अग्रिम साठी दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. या टप्प्यामध्ये १ लाख ११ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एकूण ७६ कोटी २७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान झाल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या निधीचे वितरण विविध प्रमाणामध्ये झाले आहे. परळी तालुक्यात सर्वात जास्त २५,१५५ शेतकऱ्यांना १६ कोटी ५७ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. माजलगाव तालुक्यामध्ये १९,०२७ शेतकऱ्यांना १४ कोटी १३ लाख रुपये वितरित केले आहेत. केज तालुक्यातील १९,१२५ शेतकऱ्यांना १३ कोटी ७ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये १२,३९१ शेतकऱ्यांसाठी १२ कोटी २६ लाख रुपये वितरित केले आहेत.
या पीकविमा अग्रिमचे महत्त्व अनेक पातळ्यांवर आहे. गेल्या वर्षी झालेल्या पिक नुकसानीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या निधीमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी मदत मिळणार आहे.