मंडळी आपण अनेक वेळा ऐकले किंवा वाचले आहे की शेत जमीन विकत घेताना अनेक लोकांना फसवणूक होते. अशा प्रकरणांमध्ये विशेषता एकाच जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकली जात असते, तसेच काही वेळा जमीन एकाच्या मालकीची असते आणि दुसराच व्यक्ती ती विकतो. या प्रकारच्या फसवणुकीचे अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात.
म्हणूनच लाखो रुपये खर्च करून जमीन खरेदी विक्री करताना आपण प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा लाखो रुपयांचा खर्च होऊन नंतर मानसिक तणाव, तसेच अनेक कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून, या लेखात आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगितले जाईल ज्यामुळे जमीन खरेदी विक्री प्रक्रियेतील धोके टाळता येऊ शकतात.
सातबारा उताऱ्याची तपासणी – सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा, आणि त्यामुळे तो खूप महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. जमीन खरेदी करताना त्या जमिनीचा सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता आणि त्यावरील फेरफार, तसेच ८ अ उतारे तपासून घ्यावेत. सातबारा वरील नावे विक्री करणाऱ्या व्यक्तींचीच आहेत का ते तपासून घ्या. जर उताऱ्यावर मृत व्यक्तीची किंवा इतर कोणाची नावे असतील, तर त्या नोंदी सुधारण्याची मागणी करा. तसेच, जमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज आहे का ते तपासून घ्या.
जमिनीचा नकाशा तपासणे – खरेदी करत असलेल्या जमिनीचा नकाशा पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला शेताची हद्द, गट संख्या आणि त्याचे सीमारेषा स्पष्टपणे समजून येतात. नकाशात दाखवल्याप्रमाणे जमीन अस्तित्वात आहे की नाही, हे तपासून घ्या. याशिवाय चारही बाजूला कोणत्या गट नंबरची शेती आहे, याची माहिती मिळवून घेतली पाहिजे.
शेतरस्त्याची माहिती मिळवणे – शेत जमीन खरेदी करताना रस्त्याची उपलब्धता तपासून घ्या. काही वेळा जमिनीला रस्ता नसतो आणि दुसऱ्या शेतातून रस्ता घेतल्यामुळे कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, जमिनीच्या खरेदी विक्रीपूर्वी रस्ता अस्तित्वात आहे का हे तपासून घ्या.
जमिनीची भूधारणा पद्धत तपासणे – तुम्ही खरेदी करण्याची जमीन कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते, हे तपासणे महत्त्वाचे आहे. सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धती नोंदलेली असते. भोगवटादार वर्ग एक जमिनीचे हस्तांतरण सहजपणे होऊ शकते, परंतु वर्ग दोन जमिनीवर शासनाचे निर्बंध असतात. यामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरण शक्य नाही. यामुळे, अशा जमिनीकडे लक्ष द्यावे.
जमीन खरेदी विक्री करताना या सर्व गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.