ऐन दिवाळीत खाद्य तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. दिवाळी म्हटले की, दिवाळीसाठी लागणारे फराळबनविण्यासाठी सर्वात जास्त तेलाचा वापर केला जातो.
मात्र, याचदरम्यान आता खाद्यतेलाच्या दरात वाढ केल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. खाद्य तेलाचे भाव वाढल्याने स्वयंपाक घरातील फोडणीदेखील आता महागली आहे. तेलाचे भाव एका किलो मागे तब्बल २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत.
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करावर २० रुपयांनी वाढ केली आहे. तसेच दोन टक्के सेल्स असे २२ टक्के वाढ करण्यात आली आहे. याचाच फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. मात्र, याचा सामना सर्वसामान्य ग्राहकांना करावा लागत आहे.
कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे. ग्राहक खरेदी करत असलेल्या राइस ब्रान आणि सोयाबीन तेलाचा किरकोळ दर आतापर्यंत ११० रुपये प्रति लीटर होता. तो दर आता १२५ रुपयांच्या घरात गेला आहे.
गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री
१५ किलो डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपये वाढले आहेत. सूर्यफूल तेलाच्या डब्याचा जुना दर १७५० रुपये होता तर आताचे दर २१४० रुपये आहे. तसेच सोयाबीन डब्याचा जुना दर १६०० रुपये व आताचे दर २०५० रुपये आहे. पामतेल जुना दर १६०० तर आताचे १८५० रुपये दर आहेत. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी लोक राहतात. या लोकांना सध्या महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढतच असून ऐन दिवाळीच्या तोंडावर गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लागली जात आहे.