मंडळी दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण निर्माण झाला आहे. तेलाचे दर प्रतिकिलो 20-25 रुपयांनी वाढल्याने 15 किलो तेलाच्या डब्ब्यासाठी 150 ते 200 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. सध्या सोयाबीन तेलाचा 15 किलोचा डब्बा जवळपास 2,000 रुपयांवर पोहोचला आहे, तर सूर्यफूल तेलाच्या डब्ब्याची किंमत 2,100 रुपये झाली आहे.
या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली वाढ. यामुळे सणासुदीच्या काळात अचानक तेलाच्या किमती वाढल्या आहेत. विशेषता सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसत असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकाच्या खर्चावर होत आहे.
आयात शुल्क वाढवण्याबरोबरच सणासुदीच्या काळात तेलाच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे किमती आणखी वाढल्या आहेत. दिवाळीसारख्या सणांमध्ये गोडधोड पदार्थ तयार करण्यासाठी तेलाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने ही दरवाढ कुटुंबांच्या बजेटवर अतिरिक्त भार ठरत आहे.
दिवाळीनंतर काही काळ खाद्यतेलाच्या किमती उच्चस्तरावर राहण्याची शक्यता आहे. सरकारने केलेल्या आयात शुल्कवाढीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कमी दरात आयात केलेल्या साठ्यांचा पुरवठा 45-50 दिवस टिकण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार आणि मागणी कमी झाल्यानंतर किमती कमी होण्याची शक्यता आहे. सरकार स्थानिक तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलत आहे, ज्याचा लाभ दीर्घकालीन स्वरूपात मिळेल.