कढईतल्या फोडणीपेक्षाही जादा तडतड आता गृहिणींची व्हायला लागली आहे. कारण खाद्यतेलाचे दर तब्बल ३० टक्क्यांनी वाढले आहेत. नवरात्र, दसरा, दिवाळी सण तेलाशिवाय साजरे होऊच शकत नाहीत आणि तेलाच्या दराने अचानक उसळी मारली आहे.
सांगली जिल्ह्यात रोज अंदाजे १०० टन तेलाची उलाढाल होते, पण १५ किलो तेलाच्या डब्यामागे ८०० रुपयांनी वाढ झाली आहे, ही गोष्ट सामान्याचे बजेट कोलमडून टाकणारी आहे. दर जितका वेगाने वाढला, तितकीच मागणीही वेगाने वाढते. त्यामुळे यंदा खाद्यतेलाचे दर वाढल्याचा परिणाम सणांच्या आनंदोत्सवावर होणार हे नक्की.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चायना बोर्ड ऑफ ट्रेड आणि क्वालालंपूर कमोडिटीमध्ये कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत आणि त्यावर सरकारने आयात कर २० टक्क्यांनी वाढवल्यामुळे सोयाबिन, पामतेल, सूर्यफूल तेल दरात वाढ झाली. त्यामुळे ऐन सणांच्या तोंडावर तेल महागल्याने ग्राहक, गृहिणी नाराज असल्या तरी तेल खरेदीशिवाय पर्याय नाही.
नवरात्रात घरात, मंदिरात दिवस रात्र तेलाचे दिवे लावले जातात. त्यामुळे खाद्यतेल आणि दिवालाची मागणी वाढते. तेलातले खाद्यपदार्थ अधिक बनवले जातात. दसऱ्यानंतर ग्रामीण भागात यात्रा, जत्रा, उरूस असतात. त्यामुळेही खाद्यतेलाची अधिक विक्री होते. लग्नसराईत तर सगळेच तेल अधिक विकले जाते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत राहिले, तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हिवाळ्यात खोबरेल आणि तीळतेलाची मागणी वाढते. जिल्ह्यात सोयाबिन आणि सरकी तेलाला अधिक मागणी आहे.
सामान्य ग्राहक १५ किलोचा तेलाचा डबा खरेदी करण्याऐवजी लिटरच्या पिशव्याच खरेदी करत आहेत. आणखी दर वाढण्याच्या भीतीने ग्राहक आणि व्यापारीही तेलाचा साठा करत आहेत. दरवाढीने फोडणीचा ठसका कमी केला. त्यामुळे गृहिणींची आता खरी कसरत आहे.
शेंगतेल, सरकीतेल, खोबरेल ही स्थानिक बाजारपेठेतून उपलब्ध होतात, मात्र त्यांचेही दर तितक्याच पटीत वाढले आहेत. काही ठिकाणी घाण्याचे तेलही वापरले जाते. मात्र त्यांचे दर आधीच दुप्पट-तिप्पट असल्याने ते वापरणारा ग्राहक वर्ग अगदीच मर्यादित आहे. खोबरेल औषधासाठी वापरतात. त्यामुळे त्याची मागणीही वाढत आहे. नवरात्रात देव बसले की सर्व मंदिरांत तेल घालायला जाण्यासाठी भाविकांची गर्दी वाढते. त्यामुळे तेलाची मागणी वाढते. तसेच हिवाळ्यात खाद्यतेलाची मागणी नेहमीच दुपटीने वाढते.
तेलाचे आजचे दर
तेल | दर १५ किलो |
---|---|
सरकी | २२०० ते २३०० |
सुर्यफुल | २३०० ते २४०० |
सोयाबीन | २१५० ते २२५० |
पामतेल | २१०० ते २२०० |
खोबरेल | ३०० रुपये किलो |
तेल | दर लिटर |
---|---|
सुर्यफुल | १४० |
सोयाबीन | १४० |
पामतेल | १३५ |
शेंगदाणा तेल | १८० |
मोहरी तेल | १६० |
तीळतेल | १७० |