नमस्कार मित्रांनो दिवाळीला सुरुवात झाली आहे, आणि आज म्हणजेच 28 ऑक्टोबरला वसुबारसने या सणाचा पहिला दिवस साजरा होत आहे. यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या दिवाळीत पावसाची शक्यता आहे. जरी हा पाऊस मोठ्या प्रमाणात नसला तरी रिमझिम स्वरूपात पडू शकतो, त्यामुळे फटाके वाजवण्यावर काही प्रमाणात नियंत्रण येण्याची शक्यता आहे.
दिवाळी सुरू असताना रब्बी हंगामाचीही सुरुवात झाली आहे, आणि शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या कापणीला सुरुवात केली आहे. परंतु पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस होईल. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांचा समावेश आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह 32 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात.
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, आणि परभणी या ठिकाणी देखील 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे दिवाळी सणात काही प्रमाणात नाराजी येऊ शकते, तर शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या कापणीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.