मंडळी खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने यास मंजुरी दिली असून, भारतीय कृषी विमा कंपनीला शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा अग्रिम वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात एकूण ६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा अग्रिम मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी १ जूननंतर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्यात आली. १ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता.
जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. २ सप्टेंबर रोजी झालेल्या तीव्र पावसामुळे अनेक शेती क्षेत्रे पाण्याखाली गेली. परिणामी, पीक विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याच्या तक्रारी जिल्हास्तरीय समितीला प्राप्त झाल्या. त्यानुसार, ९ सप्टेंबर २०२४ रोजी समितीच्या बैठकीत सॅम्पल सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपनीने हे सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर केल्यानंतर समितीने त्यास मान्यता दिली.
समितीच्या मंजुरीनंतर, जिल्ह्यातील ६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम देण्यात येणार आहे, तर वैयक्तिक नुकसानीच्या आधारावर २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे. जिल्हा संनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर ही यादी विमा कंपनीकडून मुख्यालयास पाठवण्यात आली आहे. सरकारचा निधी प्राप्त झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ५५ हजार ७१४ शेतकरी पीक विमा अग्रिमसाठी पात्र ठरले आहेत, तर १० हजार ५७६ शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी निश्चित झाले आहे. आष्टी तालुक्यात १९ हजार ४४३ शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळेल, तर ५५ हजार ७८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. बीड तालुक्यातील ९३ हजार ७१६ शेतकऱ्यांना अग्रिम लाभ दिला जाईल आणि ४२ हजार ९७३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
धारूर तालुक्यातील ३८ हजार ७३२ शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळणार आहे, तर ५ हजार ७१९ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल. गेवराई तालुक्यात १ लाख ५३ हजार ६८४ शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळेल आणि ३२ हजार ९३५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. केज तालुक्यातील ६५ हजार ५९३ शेतकरी अग्रिम लाभासाठी पात्र आहेत, तर २५ हजार ८३६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.
माजलगाव तालुक्यात ६५ हजार ४१५ शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम दिला जाणार आहे, तर १४ हजार ९३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. परळी तालुक्यातील ५६ हजार ६१४ शेतकऱ्यांना अग्रिम मदत मिळेल आणि १५ हजार १८७ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.
पाटोदा तालुक्यात २६ हजार ३४५ शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळणार आहे, तर १८ हजार ११८ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल. शिरूर तालुक्यातील ५३ हजार २ शेतकरी अग्रिम लाभासाठी पात्र ठरले आहेत आणि १८ हजार ५५८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. वडवणी तालुक्यात ३१ हजार ४६६ शेतकऱ्यांना अग्रिम मदत मिळेल, तर ५ हजार ३८७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विमा कंपनीकडून प्रक्रिया पूर्ण होताच सरकारच्या निधीतून पीक विमा भरपाई वितरित केली जाईल.