नमस्कार शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात कालच्या तुलनेत किंचित नरमाई दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडच्या किंमतीतही घसरण झाली. दुपारपर्यंत सोयाबीन वायदे 10.33 डॉलर्स प्रतिबुशेल्सवर तर सोयापेंड वायदे 323 डॉलर्स प्रतिटनांवर होते. देशांतर्गत बाजारात मात्र सोयाबीनचे दर स्थिर होते. सध्या सोयाबीनचा भाव 4,600 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहे, तर प्रक्रिया प्लांट्सनी 4,800 ते 4,900 रुपयांच्या दराने दर जाहीर केले. अभ्यासकांच्या मते, सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.
कापसाचे दर स्थिर
कापसाच्या दरातही चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारच्या तुलनेत किंमतीत वाढ झाली असून वायदे 73.94 सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले. देशांतर्गत वायदे मात्र घसरून 58,410 रुपये प्रतिखंडीवर आले. जागतिक बाजारात कापसाच्या दरावर दबाव दिसून येत आहे. पुढील महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरात चढ-उतार सुरूच राहतील, असे अभ्यासकांचे मत आहे.
मक्याचा दर स्थिर
सध्या देशांतर्गत बाजारात मक्याला चांगली मागणी आहे. इथेनॉल उत्पादनासाठी तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून खरेदी सुरू आहे. मात्र, पुरवठा आणि बाजारातील आवक मर्यादित असल्याने मक्याचे दर टिकून आहेत. सध्या मक्याला 2,300 ते 2,800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. सरकारच्या धोरणांवर बाजाराचे लक्ष आहे, त्यामुळे दर वाढीवर काहीसा दबाव जाणवतो. आगामी काळातही मक्याला चांगली मागणी राहील, असा अंदाज आहे.
हरभऱ्यात तेजी कायम
देशातील बाजारात हरभऱ्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सणासुदीच्या कालावधीत हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, साठेबाजांनी पुरवठा मर्यादित केल्याने दरात सुधारणा झाली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, वाढलेल्या दरांमुळे मागणी कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आयात मालही उपलब्ध होत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दरात चढ-उतार सुरूच राहतील, असे अभ्यासकांचे मत आहे.