नमस्कार शेतकरी मित्रांनो देश आणि राज्यात कापसाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे, आणि बाजारात कापसाची आवक सुरू झाली आहे. पण पावसामुळे कापसाचा दर्जा खालावल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. सध्या कापसाचे दर 6600 ते 7000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत. कापसाच्या किमतीत घट होण्यामागे कारणे स्पष्ट करताना कॉटन असोसिएशन जिनिंगचे संचालक ललित भोरट यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी भारतातील गाठीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांपेक्षा अधिक असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी परदेशातून 22 लाख गाठींची बुकिंग केली होती. या हंगामात भारतात 22 लाख गाठींची आयात होणार आहे, ज्याचा परिणाम भारतीय कापसाच्या बाजारभावावर झाला आहे.
भारतात जानेवारीपर्यंत या 22 लाख गाठींची आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात कापसाची मागणी वाढण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर, सिसिआयकडे 11 लाख गाठी साठ्यात आहेत, ज्यांचा लवकरच लिलाव होणार आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापूस 54 हजार रुपये प्रति खंडी एवढ्या दराने उपलब्ध आहे, आणि भारतीय कापसाची निर्यातदेखील थांबली आहे. स्थानिक बाजारात कापसाला मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांना विद्यमान दर परवडत नाहीत, त्यामुळे कापसाची आवकही थांबली आहे.
पूर्वीच्या दरानुसार स्थानिक बाजारात जी बुकिंग झाली होती त्याअंतर्गत आयात केलेल्या 22 लाख गाठींचाही परिणाम सध्याच्या कापसाच्या दरांवर होत आहे. अशा परिस्थितीत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे ललित भोरट यांनी सांगितले.