नमस्कार शेतकरी मित्रांनो परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, आद्रतेच्या प्रमाणानुसार कापसाला 7363 ते 7438 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे, अशी माहिती समितीच्या सूत्रांनी दिली आहे. 11 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीच्या उद्घाटनाचा सोहळा झाला.
9% आद्रतेच्या कापसाला 7445 रुपये तर 10% आद्रतेच्या कापसाला 7380 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. कापसाची आद्रता कमी असल्यास त्याला अधिक दर मिळतो.
बाजार समितीच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. नोंदणी केल्याशिवाय सिसिआय (CCI) मार्फत कोणतीही कापूस खरेदी होणार नाही, असे आवाहन सिसिआयचे प्रतिनिधी आणि बाजार समितीने केले आहे.
2024-25 हंगामासाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भारतीय कापूस महामंडळाने (CCI) हमीभावाने कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. हमीभावानुसार मध्यम धाग्याचा कापूस प्रति क्विंटल 7121 रुपये आणि लांब धाग्याचा कापूस प्रति क्विंटल 7521 रुपये दराने खरेदी केली जाईल. या खरेदी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गंगाखेड रस्त्यावरील अरिहंत फायबर्स येथे हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबवली जाईल.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी येताना चालू आर्थिक वर्षातील कापूस पीकपेरा असलेला ऑनलाइन 7/12 उतारा, आधार क्रमांक, संलग्न बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.