मित्रांनो भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) जानेवारीअखेर हमी दराने कापूस खरेदी थांबवणार आहे. सध्या कापसाचे दोन वेचे संपले असून हंगाम उलंगवाडीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. यानंतरचा कापूस गुणवत्तेच्या दृष्टीने फरदड श्रेणीत येत असल्यामुळे सीसीआय त्याची खरेदी करणार नाही. परिणामी, खुल्या बाजारातील कापसाची उलाढाल वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासगी बाजारातील हालचालींना चालना
खरीप हंगामातील कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक सध्या बाजारात होत आहे. कापूस पणन महासंघ मोडीत निघाल्यामुळे कापसाची हमी दराने खरेदी सीसीआय कडून केली जात आहे. कापसाचे दर रुईच्या उताऱ्यावर अवलंबून असतात. पहिल्या वेच्यातील उच्च गुणवत्तेच्या कापसापासून रुईचा उतारा ३८ किलोपर्यंत येत असल्यामुळे सीसीआय ने याला प्रति क्विंटल ७,५२५ रुपये दर दिला होता.
दुसऱ्या वेच्यातील कापूस आणि दरातील घट
दुसऱ्या वेच्यातील कापसापासून रुईचा उतारा सुमारे ३५ किलो होतो, यामुळे सीसीआय ने हमी दरात शंभर रुपयांची कपात केली आहे. तरीही शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराच्या तुलनेत सीसीआय ला कापूस विकण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या खुल्या बाजारातील सरासरी दर ७,३६२ रुपये प्रति क्विंटल आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि साठवणूक
कापसाच्या दरात वाढ होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सीसीआय ची खरेदी थांबल्यानंतर साठवलेला कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे. याशिवाय सीसीआय ने खरेदीचे प्रमाणही कमी केले असून फेब्रुवारीपासून खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे बाजारातील उलाढालींवर खासगी व्यापार्यांचा प्रभाव अधिक होण्याची शक्यता आहे.