मित्रांनो सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक योजना आहे. या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यासाठी कोटीशन (quotation) व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. याआधी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदणे, वाहतुकीसाठी पैसे देणे, तसेच सिमेंट व वाळू आणण्यास सांगणे अशा अनेक अडचणी निर्माण केल्या जात होत्या. मात्र आता महावितरण आणि राज्य सरकारने यावर कठोर पावले उचलली आहेत.
महावितरणने स्पष्ट केले आहे की कोटीशनशिवाय कोणतीही अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जाऊ नये. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पंप देण्यात येत आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान तर इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.
या योजनेत तीन एचपी सौर पंपासाठी अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना ११,४८६ रुपये आणि इतर शेतकऱ्यांना २२,९७१ रुपये भरावे लागतात. पाच एचपी सौर पंपासाठी अनुसूचित जाती-जमातींसाठी १६,०३८ रुपये तर इतरांसाठी ३२,०७५ रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
जर शेतकऱ्यांकडून यापेक्षा जास्त रक्कम मागितली जात असेल, तर त्यांनी आपल्या जवळील महावितरण केंद्रात जाऊन तक्रार करावी. महावितरणने स्पष्ट केले आहे की कोणतीही अतिरिक्त सामग्री, जसे की सिमेंट, वाळू इत्यादी आणण्याची गरज नाही आणि कोणतीही अतिरिक्त मागणी चुकीची आहे.