महिला व बालविकास विभागाकडून दरवर्षी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना भाऊबीज भेट म्हणून २ हजार रुपये दिले जातात. यंदाही जिल्ह्यातील ५ हजार ५०० अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना १.१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून रक्कम खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे.
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम ग्रामीण स्तरावर राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा मोठा सहभाग असतो.
जिल्ह्यात ५ हजार ५०० महिलांसाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून त्यानुसार संबंधितांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.
अंगणवाडी सेविकांकडे माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता आचारसंहिता लागू झाल्याने योजना थांबविण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या कामात सुटका झाली आहे. शिवाय दिवाळीत सुट्ट्याही मिळाल्याने अंगणवाडी सेविका, मदतनिसांची दिवाळी आनंदात साजरी होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना महिला व बालविकास विभागाकडून दरवर्षी भाऊबीजची भेट दिली जाते. यंदाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीजनिमित्त २ हजारांची ओवाळणी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
वाढीव मानधनाची प्रतीक्षा कायम…
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मध्यंतरी शासनाने घेतला होता. त्यानुसार दिवाळीपूर्वी मिळणारे वेतन वाढ मानधनासह मिळेल, अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होती. तथापि, वाढीव मानधनानुसार वेतन मिळाले नसल्याचे अंगणवाडी सेविकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वाढीव मानधनाची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसते.