मंडळी राज्यात लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळत असताना, राज्य सरकारने आता नवीन कृती योजना आखली आहे. या अंतर्गत लाखो महिलांची पात्रता पुन्हा एकदा तपासली जाणार असून, काही महिलांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे.
राज्यभरात अर्जांची पडताळणी करण्यासाठी सरकारने नवे निकष लागू केले आहेत. या निकषांनुसार ज्या महिला पात्र ठरत नाहीत, त्यांना योजनेतून बाहेर काढले जाईल. विशेषता अंगणवाडी सेविका आणि आरटीओ विभागाला ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. पण राज्य सरकारच्या मते काही अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे योजनेचा बोजा वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने हे कठोर निर्णय घेतले आहेत.
नवीन निकषांनुसार, महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास त्या अपात्र ठरतील. तसेच, सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय महिलेच्या किंवा तिच्या पती अथवा सासरच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास देखील त्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
या योजनेसाठी अर्ज करताना महिलांनी खोटी माहिती दिली असल्याचे आढळल्यास, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील अनेक महिलांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अद्ययावत माहिती व अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी महिलांना अधिकृत वेबसाइटवर भेट देता येईल.